Antilia Case : शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना (Sachin Waze) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वाझे यांना कथिल वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून सचिन वाझे तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे सचिन वाझे (Sachin Waze) यांनीही जामिनासाठी याचिका केली होती. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी पार पडली असून, वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला.
सचिन वाझे यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. गेल्यावर्षी वाझे यांना खंडणीच्या गुन्ह्यात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्यांचा तुरुंगवास लांबला होता. यानंतर मे महिन्यांत त्यांनी पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यानंतर आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वाझेला जामीन यांना जमीन मिळाला आहे.
मात्र, १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात सचिन वाझे यांना जामीन मिळाला असला तरी देखील वाझे यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण, त्याच्यावर अँटेलिया स्फोटक प्रकरणात गंभीर आरोप आहेत. याप्रकरणातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असून एनआयएकडून तपास सुरू आहे.