Devendra Fadnavis : ‘आम्ही महायुती एकत्र आहोत, आमचंच सरकार येणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी (Maharashtra Assembly Election 2024) नकारात्मकता तयार झाली होती, त्यानंतर आम्ही सावधपणे काम केलं आणि आता सकारात्मकता आली असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे, पण लोकसभेनंतर परिस्थिती बदलली आहे, महाराष्ट्रातील वातावरण बदललं आहे, आता विरोधकांचा फेक नरेटिव्ह गेला आहे. या विधानसभेत भाजप १०० चा आकडा पार करेल. असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 7,995 उमेदवारांनी 10,905 उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. महाराष्ट्रातील एका टप्प्यातील निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
राज्यातील निवडणुका आता तोंडावर आल्या असून, सर्व प्रक्षांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नुकतीच भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जारी केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदींसह राज्यातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.