Hemant Soren : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरासह इतर ठिकाणी आयकर विभागाचे छापे टाकले आहेत. आयकर विभागाकडून रांची आणि जमशेदपूरसह 9 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
सुनील श्रीवास्तव हे मुख्यमंत्री सोरेन यांचे वैयक्तिक सल्लागार आहेत. छाप्यादरम्यान आयकर विभागाने त्यांच्या निवासस्थानाची कसून झडती घेतली आहे. तसेच कागदपत्रांची देखील तपासणी केली आहे. ही कारवाई एका महत्त्वाच्या तपासाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी, 14 ऑक्टोबर रोजी ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या सरकरमधील मंत्री मिथिलेश ठाकूर यांचा भाऊ विनय ठाकूर, खाजगी सचिव हरेंद्र सिंह यांच्यासह अनेकांच्या घरावर छापे टाकले होते.
#WATCH | Jharkhand: Raid by a central agency underway at the residence of Sunil Srivastava, personal secretary of CM Hemant Soren, in Ranchi
More details awaited. pic.twitter.com/Vd5bNiRPoB
— ANI (@ANI) November 9, 2024
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना जूनमध्ये झारखंड उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. सात तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री सोरेन यांना ३१ जानेवारी २०२४ रोजी अटक केली होती. यानंतर हेमंत सोरेन यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एका मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.
दरम्यान, झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून, पहिल्या टप्प्याचे मतदान 13 नोव्हेबंरला असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल देखील २३ नोव्हेंबरलाच जाहीर करण्यात येणार आहेत.