खलिस्तानी दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या साटेलोट्याची साखळी ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल पंजाब आणि हरियाणात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात खलिस्तान टेररिस्ट फोर्स (केटीएफ) आणि अर्श डल्लाच्या अड्ड्यांचाही समावेश आहे.
एनआयएच्या पथकांनी आरोपी बलजीत मौर, अर्श डल्ला आणि केटीएफशी संबंधित लोकांच्या ठिकाणांची सविस्तर तपासणी केली. भटिंडा, मुक्तसर साहिब, मोगा, फिरोजपूर, संगरूर, पंजाबमधील मानसा आणि हरियाणातील सिरसा जिल्ह्यात शोधमोहीम राबवण्यात आली. शोध पथकांनी मोबाईल/डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रांसह अनेक गुन्हेगारी साहित्य जप्त केले.
पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथील अमनदीप नावाच्या व्यक्तीच्या घरावर देखील एनआयएने धाड टाकली आहे. अमनदीप सध्या नाभा कारागृहात बंद असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विशाल सिंगच्या मानसा येथील घरावर एनआयएने छापा टाकला. विशाल सिंग सध्या तुरुंगात असून तो अर्श डल्लाचा गुंड आहे. मोगाच्या रेगर बस्तीमध्येही एनआयएने छापे टाकलेत. याप्रकरणी तपास यंत्रणा एका व्यक्तीची चौकशी करत आहे. एनआयएने भटिंडा येथील संदीपसिंग धिल्लोंच्या घरावरही छापा टाकला.
यापूर्वी मंगळवारी पोलिसांनी मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणातील एका फरार आरोपीला अटक केली होती. कामरान हैदरची अटक हे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी सिंडिकेट नष्ट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी एनआयएने आपल्या निवेदनात म्हटले होते की, बेकायदेशीर तस्करी प्रकरणात हैदर आणि इतर 4 जणांविरुद्ध ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मंजूर आलम उर्फ गुड्डू, साहिल, आशिष उर्फ अखिल आणि पवन यादव उर्फ अफजल उर्फ अफरोज अशी चार सहआरोपींची नावे आहेत.
एनआयएने सांगितले की, सर्व आरोपी भारतीय तरुणांना लाओसच्या गोल्डन ट्रँगल भागात पाठवण्यात सक्रिय सहभागी होते. तेथे त्या तरुणांना बळजबरीने सायबर घोटाळ्यांमध्ये कामाला लावण्यात आले, ज्यामध्ये युरोपियन आणि अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. अली इंटरनॅशनल सर्व्हिसेस या कन्सल्टन्सी कंपनीच्या माध्यमातून ते सायबर गुन्हे करत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे, याशिवाय चिनी घोटाळेबाजांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीडितांकडून क्रिप्टो करन्सी वॉलेटद्वारे पैसे उकळण्यातही कामरान हैदरचा सहभाग होता. तसेच खंडणी वसुलीमध्येही तो सहभागी होता. कामरान हैदरवर 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष एनआयए कोर्टाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते