पुणे जिल्ह्यात जीबीएसने चिंता वाढवली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झालेल्या तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील चौथ्या रुग्णाचा मृत्यू आहे. पुण्यानंतर आता राज्यातील इतरही जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील नांदेड परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे.
नांदेड गावातील ह्या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात उपचार सुरु होते. दरम्यान प्रकृती अजून खराब होताना पाहून कुटुंबाने महिलेला ससून रुग्णालयात दाखल केलं होत. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा आता मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील जीबीएस बाधित रूग्णसंख्या आता 130 वर पोहोचली आहे. यापैकी 20 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.पुणे जिल्ह्यातील या 130 रूग्णांपैकी 25 रूग्ण हे पुणे महापालिका हद्दीतील आहेत. तर 74 रूग्ण महापालिका समाविष्ट गावातील आहेत. 13 रूग्ण पिंपरी चिंचवड महापालिकेत,ग्रामीणमध्ये 9 तर इतर जिल्हयातही 9 रूग्णांचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील सिंहगड रोड व जवळील परिसरामध्ये जास्त रुग्ण आढळले आहेत. दूषित पिण्याचे पाणी व दूषित अन्न याद्वारे संशयित रुग्ण आढळल्याने या भागात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसेच पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.