राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच बीड दौऱ्यावर होते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. बीड दौऱ्यावर असताना अजित पवारांनी एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. नुकताच अजित पवारांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीतून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार आणि इतर नेते यांच्यासह तब्बल ३३८ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या बीडमधील गुन्हेगारी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी हे पाऊल उचलले आहे.
बीडच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांनी येथील वाढत्या गुन्हेगारीवर देखील भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, ‘काही चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. परंतु आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचा आहे. बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार. कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्याच्या जवळचा असो, त्याला सरळ करणार म्हणजे करणार.’
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. याच पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.