Sanjay Shirsat: संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ६ मार्च रोजी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. “चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला कधीही राग नाही. त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहेत”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो आहे, हिंदुत्वाची कास आम्ही धरली आहे हे खैरेंनी मान्य केले आहे. म्हणून त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही. खैरेंना अडचणीत टाकले गेले आहे. खैरेंना मातोश्री सोडता येत नाही आणि त्यांना तिथे कोणी जवळही करत नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे, असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत दोन्ही वेळा त्यांचा जाणूनबुजून पराभव करण्यात आला. त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे, असा आरोप त्यांनी ठाकरेंवरती केला आहे.
चंद्रकांत खैरे यांनी मातोश्री सोडणार नाही असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांना माघार घेता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातून कोणी विचारत नसले तरी आम्ही विचारतो, कारण त्यांनी पक्षासाठी काही दिवस टाकलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची कदर करतो. ते आमच्याकडे आले तर त्यांचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, असे म्हणत त्यांनी खैरेंना शिवसेना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तसेच ठाकरे गटाची खिळखिळी करण्याची गरज नाही कारण आधीच त्यांच्या पक्षाचा खुळखुळा झालेला आहे, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी खैरेंना दिलेली ऑफर उद्धव ठाकरेंचे टेंशन वाढणारी आहे. आता शिरसाटांच्या या ऑफरवरती खैरे काय प्रतिक्रिया देतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.