Hapus Mango: हापूस आंब्याच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या आंब्यांना भौगोलिक नामांकन( जीआय टॅग) देण्यात आले आहे. त्यामुळे आता बनावट हापूस आंबे ओळखता येऊन ग्राहकांना खात्रीशीर हापूस आंबे मिळण्यास मदत होईल.
हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुकुंद जोशी हे याविषयी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत की, रसाळ चव आणि रंगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंब्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाही. फळ उत्पादक आणि विक्रेत्यांची सहकारी संस्था असलेल्या संघाने कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या इतर प्रदेशांमध्ये देखील पिकवल्या जाणाऱ्या आंब्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हापूस या संज्ञेच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतून आलेल्या आंब्याच्या पेट्यांमध्ये क्यूआर कोड स्कॅनिंग आहेत, ज्यामुळे शेतीची माहिती आणि जीआय टॅग मिळेल, अशी माहितीही जोशी यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यातील हापूस उत्पादकांनी बाजार समित्या आणि राज्य पणन मंडळााकडे हापूस ब्रँडचे उल्लंघन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या खरेदीदारांना ते खरेदी करत असलेल्या फळांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी आता जीआय नामांकनाचा वापर केला जाणार आहे.
जीआय टॅग मिळल्यानंतर काय होते ?
कोणत्याही उत्पादनाला जीआय टॅग मिळाल्यानंतर त्या उत्पादनाला विशिष्ट भौगोलिक ठिकाण आणि गुणवत्तेमुळे एक विशेष ओळख मिळते, जी केवळ त्या प्रदेशात पिकवलेल्या उत्पादनासाठीच असते. जीआय टॅग विशिष्ट भौगोलिक प्रदेशात तयार होणाऱ्या आणि त्या प्रदेशाच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या उत्पादनांना दिला जातो. जीआय टॅग प्राप्त झाल्यास उत्पादनाला एक विशिष्ट ओळख मिळते, ज्यामुळे ते इतर उत्पादनांपेक्षा वेगळे ठरते. जीआय टॅगमुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि अस्सलता सुनिश्चित होते, ज्यामुळे ग्राहकांचाही त्या उत्पादनावर विश्वास बसतो. आता कोकणातील पाच जिल्ह्यांतील हापूस आंब्यांना जीआय टॅग मिळाल्याने ग्राहकांना अस्सल कोकणी हापूस आंबा मिळवणे सोपे होणार आहे.