निवडणूक आयोगाने देशभरात मतदार याद्या अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी एक महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मतदार ओळखपत्र (EPIC) आधार क्रमांकाशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे दोन मतदार कार्डं बाळगणाऱ्यांना किंवा बोगस मतदारांना लगाम बसणार आहे. सध्या ६६ कोटी नागरिकांचे मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यात आले आहे. मात्र, अजूनही २२ कोटी मतदारांचे आधार क्रमांक आयोगाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या उर्वरित मतदारांची माहिती गोळा करून, मतदार यादीतून डुप्लिकेट नावे हटवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार आहे.
कशी असेल प्रकिया?
निवडणूक आयोग मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची मोठी मोहीम राबत असल्याने यामुळे यामुळे मतदार यादीतील बोगस नावे काढून टाकण्यास मदत होणार आहे.मतदार यादी अपडेट करण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्र निहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे. त्याआधारे बोगस मतदार ओळखले जातील. मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येईल. स्थानिक मतदार केंद्र, जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर छाननी झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.तसेच मतदार केंद्रनिहाय तक्रारींचं निराकरण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमले जातील. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक तक्रारी आल्यामुळे तिथे विशेष लक्ष दिलं जाणार आहे. दरम्यान वर्षअखेरीपर्यंत ५० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
या मोहिमेचे काही महत्त्वाचे फायदे
१.बोगस मतदार हटवले जातील – आधारशी लिंक केल्यामुळे एका व्यक्तीचे एकच मतदान ओळखपत्र राहील, त्यामुळे डुप्लिकेट किंवा बनावट मतदारांची संख्या कमी होईल.
२.मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल – मतदार यादी अचूक झाल्याने निवडणुकीचा निकाल अधिक विश्वासार्ह वाटेल, आणि निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास वाढेल.
३.राजकीय पक्षांना योग्य माहिती मिळेल – यादी आधीच तपासल्यामुळे, पक्ष आपले धोरण योग्य मतदारांसाठी आखू शकतील.
४.प्रशासनिक त्रुटी कमी होतील – मतदार केंद्रांवरील कर्मचारी आणि एजंट यांना प्रशिक्षण दिल्यामुळे तांत्रिक चुका, मॉक पोल मधील गोंधळ कमी होईल.
५.लोकांचा सहभाग वाढू शकतो – ‘होम टू होम’ मोहीमेमुळे लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे नाव यादीत आहे का याची खात्री करता येईल, ज्यामुळे मतदारांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
ही मोहीम फक्त मतदार याद्या सुधारण्यापुरती मर्यादित नाही, तर तिचा बहुआयामी परिणाम होणार आहे.मात्र ह्या या सगळ्या गोष्टी पाहता या मोहिमेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि लोकशाहीसाठी हिताची ठरेल अशी आशा आहे.