Sharad Pawar: पुण्यातील साखर संकुलात आज कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत बैठक पार पडली. ही बैठक जवळपास एक तास झाली. ही बैठक संपल्यावर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड जवळपास २० मिनिटे चर्चा झाली आहे. त्यामुळे विविध चर्चांणा उधाण आले आहे.
या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे जाहीरपणे शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. या आधी अजित पवार शरद पवारांसोबत बैठका किंवा कार्यक्रम टाळत असल्याचे दिसून येत होते. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाषणात बोलताना काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो, असे वक्तव्य केले होते. त्यातच आज दोन्ही पवारांमध्ये चर्चा झाल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेतकऱ्यांना फायदा कसा मिळवून देता येईल, यावर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि ते ट्रस्टी म्हणून ते या बैठकीला उपस्थित होते, असे अजित पवार म्हणाले. परंतु शरद पवारांबरोबर काय चर्चा झाली हे सांगायला मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आले.
दरम्यान, साखर संकुलमध्ये झालेल्या बैठकीत ऊस, कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका या सहा पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे हे एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.