झारखंडमधील सुरक्षा दलांना सोमवारी मोठे यश मिळाले आहे. सोमवारी सकाळी बोकारो जिल्ह्यातील लालपनिया येथील लुगु टेकडी भागात नाक्षवाद्यांसोबत झालेल्या चमकीत सुरक्षा दलाच्या पथकाने आठ नक्षलवाद्यांना ठार केले आहे, ज्यात कुख्यात नक्सली प्रयाग मांझी उर्फ विवेक याचा देखील समावेश आहे. सरकारने प्रयागर मांझीवर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
सुरक्षा अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती देताना सांगितले की, झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा कमांडोच्या संयुक्त दलांना या भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, सकाळी साडेपाच वाजता लालपनिया पोलिस स्टेशन परिसरातील लुगु टेकडी भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ज्यामध्ये आठ जण ठार झाले आहेत.’
या कारवाईत ठार झालेल्या आठ नक्षलवाद्यांमध्ये तीन हाय-प्रोफाइल नक्षलांचा समावेश होता ज्यांच्यावर १ कोटी, २५ लाख आणि १० लाख रुपयांचे बक्षीस होते. प्रयाग मांझीवर एक कोटी रुपयांचे बक्षीस होते. अरविंद यादववर 25 लाख आणि साहेबराम मांझी उर्फ राहुल मांझीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. तर महेश मांझी उर्फ मोटा, तालू, राजू मांझी, गंगा राम आणि महेश अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नाव आहे. नक्षलवाद्यांकडून चार इन्सास रायफल, एक एसएलआर आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे अडीच तास चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान, रांचीहून लुगू बाबाच्या दर्शनासाठी आलेले भाविक डोंगर चढत होते. अचानक गोळीबाराचा आवाज आला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ज्यामुळे भाविक लगेच टेकडीवरून खाली परतू लागले.
https://x.com/HMOIndia/status/1914220751135142245
दरम्यान, झारखंड पोलिस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना डीजीपी अनुराग गुप्ता म्हणाले की, ‘आम्ही चाईबासा येथील सैनिकाच्या शहीदतेचा बदला घेतला आहे. आता आमचे संपूर्ण लक्ष चाईबासामधील नक्षलवाद्यांना संपवण्यावर असेल.नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, अन्यथा गोळ्या झेलण्यास तयार राहावे. लवकरच झारखंडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा होईल.’ असे डीजीपी अनुराग गुप्ता म्हणाले आहेत.