Pahalgam Terrorist Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मिर खोऱ्यात सर्च ऑपरेशनही सुरू आहे. त्यातच आता भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईत मोठे यश मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यातील संशयित दहशतवादी आदिल आणि आसिफ यांची घरे भारतीय लष्कराने शुक्रवारी(दि. २५ एप्रिल रोजी) आयईडी स्फोटांद्वारे उद्ध्वस्त केली आहेत. तसेच शोपियान जिल्ह्यातील शाहिद अहमद कुट्टे या सक्रिय लष्कर-ए-तैयबा कमांडरचे घरही जमीनदोस्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे लष्कराने दुसरी कारवाई कुलगाम जिल्ह्यातील मातालाहामा भागात केली आहे. या भागातील सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचे घर पाडण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा बऱ्याच काळापासून या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होत्या. भारताने केलेली ही कारवाई दहशतवादी नेटवर्क कमकुवत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे कालच भारतीय सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईत ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे.
दरम्यान, भारत आता दहशतवाद्यांना चांगला धडा शिकवण्याच्या प्रयत्नात आहे. ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर'(POK)हा दहशतवादाचा गड मानला जातो. या पीओकेमध्ये दहशतवादी लाँच पॅड आहेत. आता भारताच्या गुप्तचर संस्थांना आणि लष्कराला पीओकेमधील प्रत्येक दहशतवादी लाँच पॅडची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या ठिकाणीही भारत मोठी कारवाई करू शकते.