२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली आहे. याचदरम्यान, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी या प्रकरणावर एक महत्वाचे विधान केले आहे.
पहलगाम प्रकरणावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता असंही उदाहरण यावेळी मोहन भागवत यांनी दिली. द हिंदू मेनिफेस्टो नावाच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. हा सोहळा दिल्ली या ठिकाणी पार पडला.
ते पुढे म्हणाले, ‘आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांना इजा करत नाही. पण जर यानंतरही कोणी चुकीचा मार्ग स्वीकारला तर आपल्या राजाचे कर्तव्य आहे की, तो आपल्या प्रजेचे रक्षण करेल. हा हल्ला धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाईची आठवण करून देतो. लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले व त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीही करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही पण शांतपणे अत्याचार सहन करणे देखील हे देखील आपल्या संस्कृतीचा भाग नाही. वाईटाचा अंत करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल. रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्यालाही मारण्यात आले. रामाने त्याला मारले पण त्यालाही सुधारण्याची संधी देण्यात आली होती. जेव्हा त्याने सुधारणा केली नाही, तेव्हाच त्याला मारण्यात आले.’
मोहन भागवत म्हणाले, ‘आम्हाला कडक प्रतिसादाची अपेक्षा आहे. खऱ्या अर्थाने अहिंसक व्यक्तीनेही बलवान असले पाहिजे. जर ताकद नसेल तर पर्याय नाही पण जेव्हा ताकद असेल तेव्हा गरज पडेल तेव्हा ती दाखवावी लागेल.’