उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात कानपूरचा शुभम द्विवेदी यांचाही समावेश होता. शुभमचे नुकतेच लग्न झाले होते.
योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी (२६ एप्रिल) लखीमपूर खेरी येथे बोलताना या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी सांगितले की, “नवा भारत कोणालाही त्रास देत नाही, पण जर कोणी भारताला त्रास दिला तर तो माफ करत नाही.” मुख्यमंत्री योगींनी हेही सांगितले की, आपल्या देशात दहशतवाद आणि अराजकतेला स्थान नाही. भारत सरकार हे गरीबांच्या भल्यासाठी, सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी काम करत आहे. पण जर कोणी देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कठोर उत्तर दिले जाईल.
यावेळी योगी यांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शारदा नदीच्या जलवाहिनीकरण कामाची पाहणी केली. त्यापूर्वी २४ एप्रिल रोजी, त्यांनी कानपूर येथील शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट घेतली,आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले. त्यांनी या हल्ल्याला “भ्याड कृत्य” म्हटले आणि सांगितले की, अशा घटना भारतात खपवून घेतल्या जाणार नाहीत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या हल्ल्यानंतर प्रभावित भागाची पाहणी केली आहे आणि दहशतवाद संपवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे ते म्हणाले आहेत. दुसरीकडे अशा भ्याड हल्ल्यांमुळे देशाचे एकतेचे बळ अधिकच मजबूत होताना दिसत आहे तसेच या हल्यानंतर आतापर्यंत दहशतवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाया वरून सरकार देखील दहशतवादाच्या मुळावर घाव घालण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.