पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अशा काळात देशभरातून शोक व्यक्त होत आहे. त्यानंतर या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने आता सर्व मीडिया चॅनेल्सना आणि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्यांना एक सल्ला दिला आहे.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, सुरक्षा दलांच्या मोहिमा आणि हालचाली यांचे थेट प्रक्षेपण (Live Coverage) करू नये. हे करताना राष्ट्रीय सुरक्षेला धोका होऊ शकतो. त्यामुळे सर्व मीडियाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने सांगितले की, काही वेळा अशा थेट कव्हरेजमुळे शत्रूंना उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा दलांची माहिती बाहेर जाणे धोकादायक ठरू शकते. कारगिल युद्ध, २६/११ मुंबई हल्ला आणि कंधार अपहरण यासारख्या घटनांमध्ये अशाच थेट कव्हरेजमुळे अडचणी आल्या होत्या, असेही जारी केलेल्या सल्लागारात म्हटले आहे.
म्हणूनच, मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सामान्य लोकांनीही सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करताना काळजी घ्यावी. देशाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारी घ्यावी, हीच सरकारची विनंती आहे.
याशिवाय, सरकारने टीव्ही चॅनेल्सना आधीच “केबल टेलिव्हिजन नियम २०२१” च्या नियम ६ (१) (पी) चे पालन करण्याची आठवण करून दिली आहे. या नियमानुसार, जेव्हा एखादी दहशतवादविरोधी मोहिम सुरू असते, तेव्हा तिचे थेट प्रक्षेपण करता कामा नये.
सरकारने मीडियाला दिलेला हा सल्ला केवळ नियमांची आठवण नाही, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने एक आवश्यक आणि संवेदनशील पाऊल आहे. प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि नागरिकांनी मिळून जबाबदारीने वागल्यास देशाच्या संरक्षणात आणि एकात्मतेत खरा सहभाग नोंदवता येईल. त्यामुळे आता माध्यमं सरकारच्या या आदेशाचे पालन करतील अशी आशा आहे.
Ministry of Information and Broadcasting issues advisory to all Media channels to refrain from showing live coverage of defence operations and movement of security forces in the interest of national security
"In the interest of national security, all media platforms, news… pic.twitter.com/AASdtbFgTd
— ANI (@ANI) April 26, 2025