२२ एप्रिल २०२५ भारतीयांसाठी काळा दिवस होता. या दिवशी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक पहलगाममध्ये हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी फक्त पर्यटकांना लक्ष करत धर्म विचारून गोळीबार केला. ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. पर्यटकांसोबतच काश्मीर मधील काही स्थानिकांवर देखील दहशतवाद्यांनी हल्ला केला. जे स्थानिक पर्यटकांना वाचवण्यासाठी पुढे आले त्यांना देखील गोळ्या घालण्यात आल्या. ज्यात एका २० वर्षीय काश्मिरी स्थानिकाचा देखील मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध राजनैतिकदृष्ट्या मोठी कारवाई केली आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठी पावले उचलली असली आहेत. यातील सर्वात मोठे पाऊल म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. जोपर्यंत पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवत नाही तोपर्यंत हा निर्णय स्थगित राहील, असे भारताने स्पष्टपणे सांगितले आहे. पण सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानसाठी बंद केल्याने पाकिस्तानवर कसा परिणाम होईल? याबाबत आजच्या बातमीतून जाणून घेणार आहोत…
१९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदी प्रणालीतील नद्यांच्या संदर्भात एक करार झाला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. करारात, सिंधू खोऱ्यातून वाहणाऱ्या सहा नद्यांचे पूर्व आणि पश्चिम भागात विभाजन करण्यात आले. यापैकी, बियास, रावी आणि सतलज या पूर्वेकडील नद्या मानल्या गेल्या आणि त्यांचे पाणी भारताला वाटण्यात आले. त्याच वेळी, सिंधू, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील नद्या मानल्या गेल्या आणि त्यांचे पाणी पाकिस्तानसाठी राखीव ठेवण्यात आले.
पाकिस्तानला या नद्यांमधून ८० टक्के पाणी मिळते. पाकिस्तानची २१ कोटींहून अधिक लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. पंजाब आणि सिंध प्रांतांची शेती देखील या पाण्यावर अवलंबून आहे. या करारानुसार, भारत सिंधू नदी प्रणालीतील फक्त २० टक्के पाणी वापरू शकतो. उर्वरित ८० टक्के पाणी पाकिस्तानला दिले जाते. सिंधू नदीला पाकिस्तानची जीवनरेखा देखील म्हटले जाते.
पाकिस्तानची शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीचा मोठा भाग या पाण्यावर अवलंबून आहे. अशातच आता हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान आता पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी भीक मागेल. तसेच पाकिस्तानच्या शेतीवर देखील मोठा परिणाम होईल.
पाकिस्तान आधीच आर्थिक संकटातून जात असताना व अन्नधान्याच्या कमतरतेमुळे आधीच दुष्काळाचा सामना करत असताना पाकिस्तानसाठी सिंधू नदीचे पाणी बंद केले तर पाकिस्तानचे कंबरडे मोडणार हे नक्की.