जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय समुदायात तीव्र संताप निर्माण झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी लंडनमध्ये भारतीय समुदायाचे अनेक सदस्य पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर जमले होते. त्यांनी फलक आणि भारतीय झेंडे हातात घेऊन निष्पाप लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आणि हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी केली.
या निदर्शनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, कर्नल तैमूर राहत, यांनी निदर्शकांकडे पाहून गळा कापण्याचा इशारा करत धमकी दिली. त्यांचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पाकिस्तानमध्ये घेतलेल्या चहासोबतचा फोटोही निदर्शकांना दाखवला.
या निदर्शनामध्ये ५०० हून अधिक ब्रिटिश-हिंदूं नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी दहशतवादाविरोधात घोषणा दिल्या आणि पाकिस्तानवर दहशतवादी गटांना मदत केल्याचा आरोप केला. आयोजकांनी सांगितले की, हा निषेध शांततामय होता त्याचा उद्देश पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदाऱ्यांची मागणी करणे हा होता.
खरतर एका जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने असे आक्षेपार्ह हावभाव करणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. लोकशाहीत शांततामय मार्गाने निषेध नोंदवण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असतो, पण अशा वेळी एखाद्या अधिकाऱ्याने, विशेषतः परदेशात, धमकी दिल्यासारखे वर्तन करणे अत्यंत चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्यावर निषेध करणाऱ्या निदर्शकांना अशी धमकी देणे केवळ अशोभनीय नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशाची प्रतिमा मलीन करणारेही आहे. हा प्रकार केवळ भारतीय समुदायासाठी नव्हे, तर जागतिक शांतता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय आहे.