पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) त्यांच्या मासिक रेडिओ ‘मन की बात’ या कार्यक्रमात पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना कठोर शिक्षा होईल आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळेल, असे आश्वासन भारतीय जनतेला दिले आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. अशातच देशभरातून या दहशदवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला आश्वासन दिले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
‘संपूर्ण देश पीडित कुटुंबांसोबत उभा आहे आणि दहशतवादाविरुद्ध १४० कोटी भारतीयांची एकता ही या लढाईची सर्वात मोठी ताकद आहे. आज जग पाहत आहे की , या हल्ल्यानंतर भारत दहशतवादाविरुद्ध एकजूट झाला आहे. जागतिक नेत्यांनीही भारताप्रती आपल्या संवेदना दाखवल्या आहेत. तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये परतणाऱ्या शांतता आणि विकासात व्यत्यय आणण्याचा हा अयशस्वी प्रयत्न असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे. दहशतवादाच्या समर्थकांना काश्मीरमध्ये होत असलेले सकारात्मक बदल बघवत नाहीत, म्हणूनच अशा प्रकारचा भ्याड कट रचण्यात आला.’ त्यांना शिक्षा होणार आणि इतकी कठोर शिक्षा होणार की, संपूर्ण जग पाहत राहील.’
पंतप्रधानांनी पुढे देशवासीयांना एकत्र येऊन या आव्हानाला तोंड देण्याचे आवाहन देखील केले आहे. ‘आपल्याला आपली दृढ इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईत एकजूट राहावे लागेल.’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.