शाहिद राजाई बंदर हे इराणमधील बंदर अब्बास या शहराजवळ फार मोठे महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण आहे. हे बंदर हॉर्मूझच्या सामुद्रधुनीजवळ असल्यामुळे जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जाते. या बंदरावरून तेल, गॅस, रासायनिक पदार्थ आणि धातूंची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. इथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आणि साठवणूक सुविधा असल्याने सुरक्षा व्यवस्थाही कडक असते. मात्र २६ एप्रिल रोजी या गजबजलेल्या बंदरावर एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात १४ लोकांचा मृत्यू झाला असून, ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीला सांगितले जात होते की बंदरावर ठेवलेले इंधन आणि रासायनिक साठा अचानक पेटल्यामुळे हा स्फोट झाला. पण आता काही अहवाल असेही सुचवतात की हा स्फोट घातपाताचाही भाग असू शकतो.
आता स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, दहशतवादी हल्ला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले आहेत. काही प्रत्यक्षदर्शिंनी आवाज आधीच ऐकला होता तर काहींनी या परिसरात संशयास्पद हालचाली पाहिल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या घटनेवर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.
या स्फोटामुळे बंदरावर मोठे नुकसान झाले आहे. तसेच मालवाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, जवळच्या परिसरातील अनेक घरेही प्रभावित झाली आहेत. पण हा स्फोट फक्त अपघात होता की त्यामागे कोणाचे षड्यंत्र आहे, याचा उलगडा लवकरच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.