पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांमध्ये पुण्यातील दोन जण होते. तर महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, तर या हल्ल्यात फक्त पुरुषांना टार्गेट करण्यात आले. कुटुंबाच्या आधारस्तंभाला मारले तर कुटुंब तसंही संपून जाईल अशी मानसिकता ठेवून या दहतवाद्यांनी फक्त पुरुषांना गोळ्या घातल्या.
या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूंनतर त्यांच्या घरावर मोठे आर्थिक संकट आले आहे. दरम्यान, या कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले असून, या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देता येईल का त्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
फडणवीस यांनी गणबोटे यांच्या कोंढवा येथील निवासस्थानी तर जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी भेट दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जगदाळे यांची पत्नी प्रगती, मुलगी आसावरी व मातोश्री माणिकबाई जगदाळे तसेच त्यांचे इतर कुटुंबीयांचे फडणवीस यांनी सांत्वन केले व तेथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला.