जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनेक राज्य सरकारांनीही कारवाईला सुरुवात केली आहे.
व्हिसा रद्द
27 एप्रिल 2025 पासून सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. फक्त वैद्यकीय कारणांसाठी दिलेले व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध राहतील. त्यामुळे भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाघा सीमेवरून भारतीय नागरिक मायदेशी परतले
गेल्या तीन दिवसांत 450 पेक्षा जास्त भारतीय नागरिक पाकिस्तानमधून परतले आहेत. गुरुवारी – 100, शुक्रवारी – 300, आणि शनिवारी – 23 नागरिक परतले. शनिवारी परतलेले सर्वजण PSL 2025 च्या प्रसारण कंपनीचे सदस्य होते. तसेच, 200 पाकिस्तानी नागरिक भारतातून त्यांच्या देशात परतले आहेत.
राज्यांमधील कारवाई
उत्तर प्रदेश:
सर्व पाकिस्तानी नागरिक परत पाठवले गेले आहेत. फक्त एकच नागरिक उरला आहे, तोही 30 एप्रिल रोजी परत जाणार आहे.
बिहार:
19 पाकिस्तानी नागरिक आधीच 25 एप्रिलपूर्वी परत गेले आहेत.
महाराष्ट्र:
महाराष्ट्रात सुमारे 5,000 पाकिस्तानी नागरिक आहेत.यामध्ये 1,000 लोक अल्पकालीन व्हिसावर असून त्यांना तातडीने परत जाण्यास सांगितले आहे. उरलेले 4,000 लोक दीर्घकालीन व्हिसावर आहेत त्यांनाही 27 एप्रिलपूर्वी भारत सोडण्याचे आदेश आहेत. मात्र वैद्यकीय कारणाने भारतात आलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
सरकारच्या या निर्णयाकडे पाहताना राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा आहे. सरकारला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे वाटले, म्हणून सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.