दिनांक २२ एप्रिल भारतीयांसाठी काळा दिवस…या दिवशी जम्मू-काश्मीर मधला सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याची गंभीर बाब म्हणजेच, दहशतवाद्यांनी फक्त पर्यटकांना टार्गेट करत त्यांचा धर्म विचारात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांच्या मते हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत ऑपरेशन टुपॅक २.० ची पुनरावृत्ती असू शकते. असे सांगण्यात येत आहे. आजच्या या लेखात आपण ऑपरेशन टुपॅक नेमकं काय होत? हे ऑपरेशन कधी पासून सुरु झालं? कोणाच्या नेतृत्वाखाली सुरु झालं? आणि या ऑपरेशनचा उद्देश काय होता? याबद्दल जाणून घेणार आहोत.
ऑपरेशन टुपॅक जनरल मुहम्मद जिया-उल-हक याच्या दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या सुपीक अशा मेंदूची देण होती. या ऑपरेशनद्वारे त्याने १९८२-८३ मध्ये आयएसआयच्या सहकार्याने भारताला अस्थिर करण्याचा कट रचला होता. या कटाचा एक भाग म्हणून त्याने काश्मीर आणि देशाच्या इतर भागात फुटीरतावाद आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम केले.
जियाला केवळ काश्मीर भारतापासून वेगळे करायचे नव्हते तर या ऑपरेशनद्वारे त्याला भारतात इस्लामिक बीज रोवत विजय मिळवायचा होता. त्याच्या या योजनेबाबत ‘फतह’ नावाच्या पुस्तकात लिहिले आहे. ‘फतह’ हे पुस्तक पाकिस्तानी लेखक हारून रशीद याने लिहिले आहे. हे पुस्तक जनरल अख्तर अब्दुल रहमान यांच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल रहमान हा पाकिस्तानच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटीचा माजी अध्यक्ष होता. तसेच तो आयएसआयचा प्रमुख देखील होता. या पुस्तकात लिहिल्या माहितीनुसार, रहमान हा अफगाणिस्तानातील जिहादमागील मुख्य सूत्रधार होता. याच अब्दुल रहमानने जिया-उल-हकच्या काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या योजनेला अंतिम रूप दिले होते. ही योजना १९८४ मध्ये आखण्यात आली आणि १९९१ मध्ये कश्मिर खोऱ्यात ती अमलात आणली गेली. पाकिस्तानने यापूर्वी १९४७ आणि १९६५ मध्येही अशाप्रकारे काश्मीरबाबत कट रचला होता. पण जियाने रचलेला कट या कटापेक्षा थोडा वेगळा होता. त्याची योजना केवळ काश्मीरपुरती मर्यादित नव्हती, तर तो भारताचे अनेक भागात विभाजन करण्याच्या योजनेवर काम करत होता.
जिया ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणेवर काम करत होता. जिया भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेऊ इच्छित होता. त्याने काश्मीरसह संपूर्ण भारतात जातीय तेढ निर्माण करण्याची योजना आखली होती. जनरल अयुब खानप्रमाणे, जिया देखील काश्मीरमधून जिहाद्यांची फौज तयार करण्याच्या योजनेवर काम करत होता. या योजनेअंतर्गत, काश्मिरींना पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तानात प्रशिक्षण दिले गेले होते. या दहशतवाद्यांनी स्वतःच आपापल्या भागातील लोकांमध्ये भीती निर्माण करायला सुरुवात केली आणि बऱ्याच अंशी जिया त्याच्या योजनेत यशस्वी देखील झाला.
यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया आणि खूनांची मालिका सुरू झाली. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरवला की, राज्याचे प्रशासन ठप्प झाले. श्रीनगर आणि नवी दिल्लीतील सरकारांना काय घडत आहे? हे देखील समजू शकले नाही. राज्य पोलिस दल आणि सीआरपीएफ या कारवायांना हाताळण्यात अकार्यक्षम ठरत होते. १९९० आणि १९९१ मध्ये खोऱ्यातील दहशतवाद शिगेला पोहोचला होता.
जिया आणि रहमान यांच्या कटाचे एकंदरीत चार महत्त्वाचे पैलू होते…
काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण
पाकिस्तानने नेहमीच जगाचे लक्ष काश्मीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी जनरल अयुब खानने ऑपरेशन जिब्राल्टरचा अवलंब केला होता. जिया देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चालला होता.
माध्यमांचा वापर
पाकिस्तानने माध्यमांचे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे महत्त्व ओळखले होते. जियाच्या योजनेनुसार, काश्मीरमधील तरुणांना हिंसक निदर्शने आणि दगडफेकीसाठी तयार करण्यात आले होते. जेव्हा भारतीय सैन्याने त्यांच्याशी सामना करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माध्यमांद्वारे ते अतिशयोक्तीने भारलेल्या स्वरूपात प्रसारित केले गेले. भारतीय लष्करी दल काश्मीरमधील सामान्य नागरिकांवर अत्याचार करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सैन्याच्या कृतींना मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
काश्मिरींना दहशतवादी प्रशिक्षण
जियाच्या काळात पाकिस्तानने आपली रणनीती बदलली. आपल्या दहशतवाद्यांचा एक गट पाठवण्याऐवजी, त्यांनी काश्मीरमधील स्थानिक तरुणांना हे दाखवण्यासाठी चिथावले की काश्मिरी स्वतः बंड करत आहेत. काश्मिरी तरुणांना प्रशिक्षणासाठी पीओकेमध्ये (पाक व्याप्त काश्मीर) नेण्याची तयारी करण्यात आली. त्यांना शस्त्रे पुरवण्यात आली. काश्मीरमधील स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आणि त्यांना शस्त्रे पुरवण्यात पाकिस्तानी सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
संपूर्ण भारताविरुद्ध छुपे युद्ध
जनरल जियाचे लक्ष्य फक्त काश्मीर नव्हते तर संपूर्ण भारत होते. जियाच्या आदेशानुसार, देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांची एक फौज भारतातील हाय-प्रोफाइल लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आली होती. संपूर्ण भारतातील मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यात आले. त्यामध्ये आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि केरळमधील तरुणांना पाकिस्तानात नेऊन प्रशिक्षण देण्यात आले. त्याची ही योजना अशी होती की हे दहशतवादी आपापल्या भागात परतून देशाविरुद्ध युद्ध पुकारू शकतील. अर्थात स्लीपर सेल कन्सेप्ट त्यानेच आणली.
जिया आणि रहमान यांच्या या कटाचे तीन उद्दिष्ट होते…
अल्पसंख्याकांमध्ये फुटीरता निर्माण करणे
भारतातील अल्पसंख्याकांमध्ये फुटीरता निर्माण करणे हे त्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. त्यांना वेगळा देश निर्माण करण्यासाठी चिथावणी देण्यात आली. काश्मीरमधील मुस्लिम आणि पंजाबमधील शीखांना भडकावले गेले. याचा परिणाम म्हणजे काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणावर वाढला.
आयएसआयचा वापर
पाकिस्तानने आयएसआयचा वापर शस्त्र म्हणून केला. त्यांच्या मदतीने देशात देशविरोधी गट आणि संघटना निर्माण झाल्या. बंदी घातलेला सिमी (स्टूडेंट्स इस्लामिक मूवमेंट ऑफ इंडिया) गट त्यापैकी एक होता.
नेपाळ आणि बांगलादेशमधील तळ
नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमा घातपाती कारवायांसाठी वापरणे सोपे होते. कारण तिथली सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नव्हती. त्या भागात त्यांचा तळ स्थापन करून तेथून कारवाया करण्याची जियाची योजना होती.
काश्मीरसाठी तीन कलमी योजना आखण्यात आली होती
पहिला टप्पा
या टप्प्यात दहशतवादाला छोट्या प्रमाणावर चिथावणी दिली जाणार होती. याशिवाय, राज्य प्रशासनातील महत्त्वाचे घटक कमकुवत करायचे होते. मुल्ला आणि मौलवींच्या मदतीने तरुणांना स्वतंत्र काश्मीरची स्वप्ने दाखवण्यात आली. त्यांना शस्त्रे उचलण्याची प्रेरणा देण्यात आली.
दुसरा टप्पा
खोऱ्याच्या दोन्ही बाजूंनी – दक्षिणेला पूंछ आणि उत्तरेला कारगिल-सियाचीन येथे हल्ले सुरू करून भारतीय लष्कराच्या जागांवर तसेच लष्करी मुख्यालयावर हल्ला करून राज्यातील रसद पुरवठा मार्गांमध्ये व्यत्यय आणणे.
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात त्याची योजना काश्मीर मुक्त करण्याची होती. या सुनियोजित मोहिमेनंतर काश्मीर स्वतंत्र होईल आणि पाकिस्तानचा भाग होईल अशी जियाची भाभाडी आशा होती.
जियाने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आपले जिहादी सैन्य तयार केले. त्याने जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या फुटीरतावादी भावनांना भडकावले. यासोबतच, पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामीच्या जिहादी शक्तीचा वापर करण्यात आला. परिणामी, काश्मीरमध्ये अनेक लहान दहशतवादी संघटनांनी डोके वर काढले. १९८८ ते १९९० दरम्यान, एकट्या काश्मीरमध्ये सुमारे १५० दहशतवादी संघटना कश्मीरमुक्तीसाठी कार्यरत होत्या.
परंतु काळाच्या ओघात, यातील अनेक दहशतवादी संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांना संपवल्यामुळे किंवा अटक झाल्यामुळे नष्ट झाल्या. काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एक मोठा गट तयार केला पण तरीदेखील तो गट अस्तित्वहीनच आहे.
१९९१ नंतर बदलेला भारत पाहता, भारताची लष्करी ताकत पाहता. तसेच भारत आर्थिक व इतर सामर्थ्यांचा बाबतीत कैक पटीने पुढारलेला देश झालाय, . त्यासोबतच भारताच्या राजकीय नेतृत्वाने आंतराष्ट्रीय राजकरणात आपली एक स्वत्रंत इमेज तयार केली आहे. या सगळ्या बाबी पाहता पाकिस्तानला भारत कायम डोईजडच आहे. पण तरीही भाड्याच्या पैशावर जगणारा भाडोत्री देश भारताला अस्थिर करण्यासाठी घातपाती कारवाया करतो ही आश्चर्याची बाबा म्हणावी अशीच आहे.
त्यातूनच ऑपरेशन टुपॅक सारख्या कारवायांना पाकिस्तान पुरस्कृत करत आहे ही हसण्यालायक बाब म्हणावी लागेल. कारण भारतानं ठरवलं तर एका क्षणात पाकिस्तानला बेचिराख करण्याची ताकत ठेवतं. पण तरीही उंदराला वाघाची शेपूट कुरतडायची असते तासच हा काहीसा प्रकार आहे. त्याचं चिंतन खरं दोन्ही बाजूंनी केलं गेलं पाहिजे.