जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. बैसरन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे आता या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. सध्या राष्ट्रीय तपास संस्थेने चौकशी सुरू केली असून, ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपास करत आहेत.
NIA ने मृत्यू झालेल्या पर्यटकांचे कुटुंबीय, जखमी पर्यटक, तसेच स्थानिक लोकांकडून माहिती घेतली आहे. सध्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल नेटवर्क डेटा आणि ड्रोन फूटेज यांचा तपास केला जात आहे. काही संकेत मिळाले असून, त्याद्वारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दहशतवाद्यांचा शोध सुरूच – पाकिस्तानशी संबंधाची शंका
हल्ल्यानंतर सहा दिवस उलटूनही दहशतवादी पकडले गेलेले नाहीत. यामुळे आता लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली आहे. काही गुप्तचर अहवालांनुसार हे दहशतवादी पाकिस्तानातून आले असण्याची शक्यता असून, हल्ल्यानंतर स्थानिक मदतीने लपून बसले असल्याची चर्चा आहे.
सुरक्षा यंत्रणांची कबुली
सुरक्षा यंत्रणांमध्ये चूक झाली आहे, हे एका अधिकाऱ्याने कबूल केले आहे. हल्ल्याच्या वेळी बैसरन खोऱ्यात कोणतेही पोलीस किंवा सीआरपीएफचे जवान तैनात नव्हते. जवळपास ५ किमीवर सीआरपीएफची एक चौकी होती, पण तिथून कोणीही वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकले नाही. पोलीस आणि जवानांना हल्ला झाल्याचे समजायला ४५ मिनिटे लागली.
नवीन उपाययोजना – पर्यटकांसाठी कडक नियम लागू
या घटनेनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नवीन धोरण आखण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था सक्षम नाही त्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी केली जाणार आहे. तसेच, काही संवेदनशील क्षेत्रांमध्ये ‘नो एंट्री’ झोन तयार करण्यात येतील. याशिवाय, स्थानीय गाइड्सची पार्श्वभूमी तपासणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
हा हल्ला हा केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नव्हे, तर जम्मू-काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रासाठीही मोठा इशारा आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा कामाला लागल्या असून, एनआयएच्या नेतृत्वाखाली हल्ल्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेनंतर सरकारनेही पर्यटन सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. या सुरक्षा यंत्रणेच्या सखोल तपासावरून हे स्पष्ट आहे की आता लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे