महाराष्ट्रातील सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस खात्याबाबत केलेल्या टीकेने मोठा वाद निर्माण केला होता. त्यांनी पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ती जगातली सर्वात अकार्यक्षम व्यवस्था असल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे, तर सरकारकडून कोणताही कायदा पोलीस खात्याशी संबंधित केला की, त्यांच्या ‘हफ्त्यांमध्ये’ वाढ होते, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
हे विधान प्रसिद्ध होताच संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर, संजय गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
या वादाला शांत करण्याचा प्रयत्न करत गायकवाड यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानावर खेद व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, “माझे अनुभव मी व्यक्त केले होते. पण माझा उद्देश महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या या शब्दांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करत, “एका व्यक्तीच्या चुकीचा अर्थ संपूर्ण खात्यावर लावणे योग्य नाही,” असे मत मांडले. त्यांनीही पोलीस दलाचे कौतुक करत ते शौर्य, त्याग आणि निष्ठेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, या प्रकरणाने सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढवल्या असल्या, तरी गायकवाड यांची तत्काळ माफी आणि वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला समन्वयी पवित्रा यामुळे हा वाद सध्या तरी निवळलेला दिसतो. परंतु, यापुढे सत्ताधाऱ्यांच्या प्रतिनिधींनी जाहीर वक्तव्य करताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित झाली आहे.