Ladaki Bahin Yojana: महायुती सरकारने गतवर्षी सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या सुरळीतपणे सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने या योजनेच्या रकमेत वाढ करून २१०० रूपये देण्याचे आश्नासन दिले होते. त्यामुळे २१०० रूपये कधीपासून देण्यात येतील, याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे. तसेच २१०० रूपये देण्यासाठी काम सुरू आहे, असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र विरोधक लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला सारखे धारेवर धरताना दिसत आहेत.
आता अजित पवारांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ही योजना म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या भेटीसारखी असून ती सुरूच राहील, असे त्यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना स्पष्ट केले आहे. अजित पवार म्हणाले की, “आमचे विरोधक विनाकारण चर्चा करत आहेत की सरकार ही योजना बंद करेल, त्यांची गरज संपली आहे. गरज सरो वैद्य मरो अशा चर्चा सुरू आहेत. पण मी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महायुती असे करणार नाही.”
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना आहे. तसेच, जर एखाद्या महिलेला इतर तत्सम योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असे अजित दादांनी स्पष्ट केले आहे. अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले.