India Vs Pakistan: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात धर्म विचारून केवळ हिंदू पुरूषांना टार्गेट करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरून उठला आहे. भारत सरकारनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान विरोधात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तान संबंध सध्या अधिक तणावाखाली आहेत.
एकंदरित सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता पाकिस्तानचे टेंशन वाढवल्याची एक बातमी समोर आली आहे. सध्या पाकिस्तानी सैन्यदलातील अनेक अधिकारी आणि सैनिक मोठ्या प्रमाणावर राजीनामे देत असल्याची माहिती मिळाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पाकिस्तानच्या11 व्या कोअरचे प्रमुख ओमर अहमद बोकारी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, 12 क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन, नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी आणि सैनिकांनी राजीनामे दिले आहेत. फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्ये तर 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्करी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सगळ्यांनी वैयक्तिक कारण, कामाचा वाढलेला तणाव आणि भारतासोबत निर्माण झालेल्या तणावजन्य परिस्थितीबाबत सरकारकडे नसलेले ठोस धोरण या बाबींचा उल्लेख आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.
लष्कारांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने अशा युद्धजन्य परिस्थितीत राजीनामे देऊ नयेत, अशी तंबी लष्करांना दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु जर पाकिस्तानी सैनिकांचे राजीनामे असेच येत राहीले तर पाकिस्तानसाठी हे मोठे आव्हान ठरू शकते.