मुंबईत आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, शिंदे फडणवीस सरकारने कॅसिनो कायदा रद्द केला आहे. शिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सवासह दिवाळीत नागरिकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्तही अनेक निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत .
राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहे. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्यात येणार असून पाच हजार कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ, मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी, केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम, सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे, दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन, मंडणगड येथे दिवाणी न्यायालय आदी निर्णयांचा समावेश आहे.