देशात पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे प्रत्येक पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आणि अश्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित भेटीगाठी वाढल्या असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय असा पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील नेते अनिल देशमुख यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजता राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये अंदाजे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे गृहमंत्रीदेखील होते. आणि अश्यातच या गुप्तभेटीमुळे या दोन नेत्यांमध्ये नेमके काय शिजते आहे असा प्रश्न समोर येत आहे.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. तसेच ते एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगत होते. राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्यानंतर काही महिन्यांनी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जामीन मिळाला होता. यानंतर शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि त्यानंतर आता ते राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.
राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. यामुळे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. आणि अश्यातच अनिल देशमुख यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली असावी? या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.