येत्या ३१ ऑगस्ट आणि१ सप्टेंबरला मुंबईत इंडिया या काँग्रेस प्रणित आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी जवळपास देशातले 27 पक्षांचे प्रमुख नेते यामध्ये सहभागी होत आहेत.महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट,शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या बैठकीच्या आयोजनाच्या तयारीसाठी लागले आहेत.या बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी, यजमान पद हे शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यात आले आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आली आहे
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार असून ३१ ऑगस्टला संध्याकाळी ६ नंतर इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरण व अनौपचारिक बैठक होणार आहे. तसेच त्याच दिवशी आठ वाजता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देशभरातून आलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी खास डिनरचे आयोजन केले आहे.
१ सप्टेंबर सकाळी १० वाजता इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील नेत्यांसाठी खास दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.
येणाऱ्या नेत्यांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, माकपचे सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती आदी नेते उपस्थित राहणार आहेत.
पण बैठकीसह मुंबई फिरण्याचा यातील काही नेत्यांचा प्लॅन आहे.कारण हे नेते आपल्या फॅमिलीसह येत असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र या सर्व नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची चिंता आयोजकांना पडली आहे. कारण जवळपास 150 पेक्षा जास्त नेते या बैठकीत सहभागी होणारआहेत.