भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘सलाम मुंबई’ कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा, यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
‘सलाम मुंबई’ या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री. काहलों यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या कार्यक्रमाच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
मुंबई शहरांतील विविध समाजाभिमुख आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा पुरविण्यात अथकपणे कार्यरत अशा यंत्रणा, संस्था यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. ज्यामध्ये भारतीय लष्करासह विविध सशस्त्र सेना दलांचा सहभाग घेतला जातो. सेनादलाची वाद्यवृंद पथकं आणि रणगाडे, लष्करी वाहने आदींचा सहभाग राहणार आहे. हा कार्यक्रम जास्तीत जास्त नागरिकांना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आदींना पाहता यावा यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.