मुंबई- नाशिक महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. आज रविवारी सकाळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्तीशः या मार्गाला भेट देऊन खड्डे बुजवण्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच जिथे शक्य आहे तिथे रस्ता दुरुस्ती करून अतिरिक्त मार्गिका सुरू करण्याच्या सूचना दिल्या. ठाणे कडून भिवंडीकडे जाताना मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन मार्गावरील सर्व खड्डे बुजवून हा मार्ग गर्दीच्या वेळी वापरण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
रंजनोली पुलाखालून अवजड वाहनांना गाड्या फिरवून घेता याव्यात यासाठी अतिरिक्त जागा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले. तसेच कोणते काम कुणाच्या अखत्यारीतील आहे त्यांचा मुलाहिजा न बाळगता लोकांना होणारा त्रास तात्काळ दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ताबडतोब कराव्यात असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ ठरवून द्यावी अशा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री कपिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी श्री अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त श्री विनयकुमार राठोड, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.