आजपासून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे.गुरुवार व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी या बैठकीत महायुतीच्या वतीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.तसेच आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भोजन कार्यक्रम व चर्चा आयोजित करण्यात आली आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
वरळी च्या डोम मध्ये महायुतीची ही बैठक असणार आहे. महायुतीच्या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या कडूनही पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचसोबत मतदारसंघातील काही प्रश्न असतील. या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी उपनेते यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे.