संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाअंतर्गत पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) आणि मेसर्स जेनपॅक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. डीजीआर आणि कॉर्पोरेट्स यांच्यातील सामंजस्य कराराद्वारे संरक्षण सेवांमधील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि माजी सैनिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जातो.
व्यावसायिक सेवांमध्ये जगात आघाडीवर असलेली जेनपॅक्ट माजी सैनिकांसाठी अर्थपूर्ण करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल. महासंचालक (पुनर्वसन) मेजर जनरल शरद कपूर म्हणाले, “या भागीदारीमुळे आपल्या माजी सैनिकांना उद्योग आणि कॉर्पोरेट्समध्ये अधिक वाव मिळेल आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल तसेच आपल्या माजी सैनिकांना दुसरी सन्मानजनक कारकीर्द सुरु करण्याची संधी मिळेल.”