रोजच्या घड्याळाच्या काट्यावर चाललेली धावपळ.. वाढलेल्या गरजा.. त्यासाठी चाललेली धडपड.. यांत्रिकीकरण.. जागतिकीकरण या सगळ्या रेट्यात काळ पुढे पुढे जातो आहे. दिवस उगवतात.. सरतात. रात्र येते.. जाते. काळाचे काटे पुढे सरकतात. निसर्गात बदल होत असतात. ऋतू येतात.. जातात. सणवार येतात.. जातात. या कालचक्राच्या पट्टीवरून पुढे सरकताना पंचमहाभूतांची आठवण जागती ठेवणारा.. रस, रूप, स्पर्श, गंधसंवेदना जाग्या करणारा श्रावण आला.. आला श्रावण!
शहरी माणसाला घराच्या गच्चीतून, खिडकीतून, सकाळच्या फिरण्याच्या वेळी जाता – येता हा श्रावण खुणावतोच! सहजच जातो आपण त्या निसर्गाच्या जवळ. वर्षाराणीच्या आगमनाची वार्ता घनगर्द काळ्या मेघांनी व्यापलेला आषाढ देतो. तो संपता संपताच श्रावणाची चाहूल लागते. बाहेर वातावरण कसं कुंद दमट पण धुंद करणारं असतं. आकाश पांढरट राखाडी ढगांनी व्यापलेलं. कधी ढग हळूच दूर होतात अन् सूर्याचं शांत – मोहक दर्शन होतं. त्याच्यात आग ओकणाऱ्या ‘सहस्ररश्मी’ दिसत नाहीत. घटकेत कोवळे उन – पाऊस यांचा खेळ दिसायला लागतो. कधीकधी तर आकाश आणि ढग आपल्या हातात येतील का.. इतके जवळ येतात. सृष्टीचे रूप न्याहाळावे.. हिरव्या रंगाच्या किती छटा..!उन्हाळ्यातले उघडे बोडके डोंगर, पठारं असंख्य
रानफुलं ..हिरवंगार गवत यांनी झाकून जातात. डोळ्यांना सुखद शांत गारवा देतात. अशी नववधूचा वेश ल्यायलेली पृथ्वीमाता अंगोपांगी बहरते.. फुलारते. मंदिरात पूजेसाठी जाणाऱ्या, नागपंचमीला वारुळाकडे जाणाऱ्या मुली – स्त्रिया.. त्यांच्या रेशमी वस्त्रांची सळसळ..पैंजणांची रुणझुण.. घंटांचे – आरत्यांचे नाद, घराघरांतून येणारे गोडाधोडाचे, पुरणावरणाचे दरवळ! तर एखाद्या घरातून येणारा खमंग भज्यांचा वास! कधी गडगडाटी हास्य.. तर कधी हास्याची कुजबुजती खसखस.. सारेच कसे रस- रंग – स्पर्श सुखावणारे…
क्रमशः
-सौ मीरा जोशी
सौजन्य- समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र