राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (1 सप्टेंबर, 2023) छत्तीसगडमधील बिलासपूर येथील गुरु घासीदास विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आधुनिक जगात व्यक्ती, संस्था आणि देशांनी नावीन्यपूर्ण शोध घेण्यात पुढे राहिले पाहिजे आणि अधिक प्रगतीसाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योग्य सुविधा, योग्य वातावरण आणि प्रोत्साहन आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. गुरू घासीदास विद्यापीठात, विविध उपक्रम आणि प्रयोगांवर आधारित संशोधन केंद्राची स्थापना केल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. आपल्या उपयुक्त संशोधनातून हे केंद्र आपला ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चांद्रयान-3 मोहिमेच्या नुकत्याच मिळालेल्या यशाबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या यशामागे समर्पण आणि वर्षानुवर्षाची मेहनत करून मिळवलेली क्षमता आहे.
गुरू घासीदास विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. निसर्गाविषयी संवेदनशीलता, सामुदायिक जीवनातील समानतेची भावना आणि आदिवासी समाजातील महिलांचा सहभाग ही जीवनमूल्ये विद्यार्थ्यांना, त्यांच्यापासून शिकता येतील, असे त्या म्हणाल्या.