मराठा समाजाच्या उपसमितीसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सरकार मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे म्हंटले आहे.
जालन्यात शुक्रवारी मराठा आंदोलनावेळी हिंसाचार झाला.पोलिसांनी लाठीमार केल्याने राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला.परंतु, लाठीमार का झाला हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “माझ्यावर आरोप करत आहेत, गृहमंत्र्यांवर आरोप करत आहेत. आधी कोणावर आरोप करायचे ते ठरवा. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश आम्ही देऊ शकतो का? हे चुकीच्या पद्धतीने आरोप करणे , सरकारला बदनाम करण्याचं काम सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काल उपोषणस्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. या भेटीवरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टोला लगावला आहे. मराठा समाजाचा गळा घोटणारे गळा काढायला गेले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ते टिकले पाहिजे ही भूमिका आमची आहे. त्यासाठी आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे.मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे फायदे मिळतात ते देत आहोत. आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.