केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत ”शिक्षण ते उद्यमशीलता : विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योजकांच्या पिढीचे सक्षमीकरण” या शिक्षण मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि मेटा यांच्यातील 3 वर्षांच्या भागीदारीचा प्रारंभ केला. मेटा आणि राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि सीबीएसई यांच्यात इरादा पत्राची देवाणघेवाण झाली.
शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आज सुरू करण्यात आलेला हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याच्या आणि आपली अमृत पिढी सशक्त बनवण्याच्या संकल्पनेला चालना देणारा आहे, असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना सांगितले.
‘शिक्षण ते उद्यमशीलता’ ही भागीदारी मोठे परिवर्तन घडवणारी असून डिजिटल कौशल्याला तळागाळापर्यंत नेईल.यामुळे आपल्या प्रतिभा सेतूची क्षमता बांधणी होईल, विद्यार्थी, तरुण, कामगार आणि सूक्ष्म उद्योजक यांना भविष्यवेधी तंत्रज्ञानाने जोडले जाईल आणि आपली अमृत पिढी नव्या युगातील समस्या सोडवणाऱ्या आणि उद्योजकांमध्ये रूपांतरीत होईल, असे प्रधान यांनी सांगितले. संपूर्ण समाजाला तंत्रज्ञान न्याय्य रूपाने उपलब्ध व्हावे यासाठी भारताची लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता या तंत्रज्ञानाच्या रूपांतरणाशी जोडल्या जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले.
झपाट्याने बदलणार्या काळात तंत्रज्ञान आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकसित परिदृश्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी कौशल्यांसह सुसज्ज असण्याच्या अनुषंगाने आपले तरुण आणि कर्मचारी तयार करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे हे राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.डिजिटल कौशल्ये,नवोन्मेषी व्यवस्थेमध्ये कौशल्य आणि उद्योजकतेचे प्रतिनिधित्व करताना, अधिक महत्त्वाचे म्हणजे लाखो लहान ग्रामीण, सूक्ष्म आणि स्वयंरोजगार उद्योजक यांच्यातील सेतूचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना विस्तारण्यासाठी , वाढीसाठी आणि यशस्वी होण्यासाठी सक्षम करतात, असे त्यांनी सांगितले.
मनुष्यबळ, शिक्षण आणि कौशल्य या दोन सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांमधील एकत्र भागीदारी करण्यासाठी दिलेल्या पाठबळाबद्दल, जागतिक व्यवहार विभागाचे मेटाचे अध्यक्ष सर निक क्लेग यांनी व्हिडिओ संदेशात, धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले.
राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकाससंस्थेसह भागीदारी अंतर्गत, पुढील 3 वर्षांमध्ये 5 लाख उद्योजकांना मेटाद्वारे डिजिटल विपणन कौशल्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होईल. नवोदित आणि विद्यमान उद्योजकांना 7 प्रादेशिक भाषांमध्ये मेटा मंचाचा वापरून डिजिटल विपणन कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.