आपल्या भारतात दिनांक 5 सप्टेंबरला शिक्षकांप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मान- दिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. गुरुपरंपरा हे भारतीय संस्कृतीचं फार मोठं वैशिष्टय़ म्हणता येईल. फार फार पूर्वीपासून अगदी हजारो वर्षांपासून भारतात आध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञान देणारी गुरुपरंपरा आहे. शिक्षण, क्रीडा, संगीत- नाट्य- चित्र आदि कला, वैद्यक, न्यायशास्त्र, अध्यापन अशा असंख्य क्षेत्रात शिक्षक-विद्यार्थी, गुरू-शिष्य हे नाते दिसते. गुरूला शिष्याबद्दल प्रेम आणि शिष्याला ज्ञान घेण्याची वृत्ती, नम्र भाव असेल तर हे नाते फुलत जाते.
आपल्याकडे गुरुशिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा खूप मोठा असतो. जिथे उत्तम शिक्षण आणि संस्कार आहे तिथे विकास आहे. व्यक्तीची जडणघडण होताना शिक्षकाचा खूप मोलाचा सहभाग असतो. शिक्षक दिनाच्या दिवशी समाज आणि विद्यार्थीवर्गानी नतमस्तक होऊन शिक्षकांचा सन्मान व्हावा असे डाॅक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले.
1962 साली उपराष्ट्रपती असलेल्या, ऋषितुल्य, तत्त्ववेत्ते, नीतिशास्त्रज्ञ असलेल्या डाॅक्टर राधाकृष्णन यांच्याकडे – त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा – म्हणून काही लोक गेले. त्यावेळी -‘आपला जन्मदिवस हा शिक्षकांचा, आचार्य कुलाचा सन्मान करून साजरा केलेला मला अधिक आवडेल’ असे त्यांनी सांगितले. तेव्हापासून भारतभर त्यांच्या जन्मदिनी शिक्षकदिन साजरा केला जातो.
आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी गावात 5 सप्टेंबर 1888मध्ये डाॅक्टर राधाकृष्णन यांचा जन्म एका सुसंस्कृत धार्मिक घरात झाला. अतिशय बुद्धिमान असलेल्या त्यांचे शिक्षण तिरुत्तानी-वेल्लोर-चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते एम.ए. झाले. चेन्नई-म्हैसूर-कलकत्ता अशा ठिकाणी त्यांनी 30 ते 40 वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘वेदांतील नीतिशास्त्र’ या ग्रंथावर प्रतिक्रिया दिली होती. डाॅक्टर राधाकृष्णन फार मोठे तत्त्ववेत्ते आहेत. त्यांचा ‘कल्की – मानवी संस्कृतीचे भवितव्य’ हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यात त्यांनी -‘ माणसाला सुख, समाधान, शांती मिळवायची असेल तर भौतिकतेबरोबरच परमेश्वराची कास धरावी लागेल.’ हा विचार दिला. ‘विज्ञान – अध्यात्म हात धरून चालतील तर माणसाची प्रगती होईल.’- हे विचार मांडणारी त्यांची व्याख्याने ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वर्ड विद्यापीठात झाली. ‘ रविंद्रनाथांचे तत्त्वज्ञान ‘, ‘ समकालीन तत्त्वज्ञानात धर्माचे स्थान’ हे डाॅक्टर राधाकृष्णन यांचे ग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यासासाठी लावले होते.
स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, रशियात भारताचे राजदूत, 18-18तास अभ्यास करणारे अभ्यासक, उत्तम अध्यापक, युनेस्कोचे अध्यक्ष राहिलेले थोर तत्त्ववेत्ते, नीतिशास्त्रज्ञ यांचा जन्मदिवस भारतभर शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो, भावी पिढी समर्थ, सक्षम बनवणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी !!!
सौजन्य – समिति संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत