आई वडिलांनंतर संस्कार देण्याचे आणि घडवण्याचे काम कोण करत असेल तर तो गुरु, शिक्षक. आज अशाच एका महान शिक्षकाचा जन्म दिवस भारतात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातोय. देशाचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती अशी एक ना अनेक पदं त्यांनी भूषवली. देशाने त्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवलं अशा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
त्यांच्या जन्मदिनी सहकारी आणि विद्यार्थ्यांनी जन्मदिवस साजरा करण्याविषयी विचारलं होतं. तेव्हा राधाकृष्णन यांनी अशी इच्छा व्यक्त केली की,माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी या दिवसाला शिक्षकदिन म्हणून साजरा केलात तर मला खूप आनंद होईल. त्यानंतरच राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. देशात पहिला शिक्षकदिन 5 सप्टेंबर 1962 ला साजरा करण्यात आला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांच्या आयुष्यातील 40 वर्षे शिक्षक म्हणून काम केलं.
तामिळनाडुतील तिरुतनी गावात 1888 साली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. लहानपणीच त्यांच्यातली प्रतिभा पाहून शिक्षणासाठी तिरुपती मिशन स्कूलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी एमए पूर्ण केलं आणि मद्रास रेसिडन्सी कॉलेजमधअये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम कऱण्यास सुरुवात केली. त्यांचा शिक्षणाचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. असंही म्हटलं जातं की राधाकृष्णन यांच्या वडिलांना वाटायचं की मुलाने इंग्रजी शिकू नये आणि मंदिरात पुजारी व्हावं.
देशात तर त्यांची ख्याती होतीच पण परदेशातही ज्ञानदानाचे काम त्यांनी केले. कोलकाता विद्यापीठात प्राध्यापक झाले, आंध्रप्रदेश विद्यापीठाचे कुलपतीसुद्धा होते. याशिवाय ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं.
बनारस हिंदू विद्यापीठात शिकवण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काही अटी घातल्या होत्या. तिथं वेतन न घेता त्यांनी कुलगुरु पदाची जबाबदारी सांभाळली. खरंतर आठवड्यातून तीन दिवस आणि जास्तीजास्त तीन वर्षेच सेवा करेन असं त्यांनी आधीचे कुलगुरु महामना यांना सांगितलं होतं. मात्र बनारस हिंदू विद्यापीठात आल्यानंतर ते अटच विसरून गेले. त्यांनी पुढची नऊ वर्षे बीएचयूमध्ये सेवा केली.
आठवड्याच्या शेवटी ते यायचे आणि काम झालं की रेल्वेनं कोलकत्त्याला परत जायचे. राधाकृष्णन यांच्याबद्दलचा एक किस्सा बीएचयूचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी विश्वनाथ पांडे यांनी सांगितला होता. एकदा क्लार्कने त्यांना टॅक्सी आणि रेल्वेचं भाडं असं मिळून साडेतीन रुपये परत दिले होते. तेव्हा राधाकृष्णन यांनी त्यातले 50 पैसे परत दिले होते. तेव्हा क्लार्कने कारण विचारण्याआधीच त्यांनी सांगितलं की, हे पैसे मी माझ्या खाजगी खर्चासाठी वापरले होते ते परत घ्या.
राष्ट्रपती आणि पहिले भारतरत्न राधाकृष्णन हे 1949 ते 1952 या काळात ते भारताचे USSR चे राजदूत म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 1952 पासून 1962 पर्यंत भारताच्या उपराष्ट्रपती पदावर होते. पुढची पाच वर्षे 1962 ते 1967 ते देशाचे राष्ट्रपती झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी 1954 त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरव केला. अशा या महान शिक्षकाचे निधन दीर्घ आजाराने 17 एप्रिल 1975 रोजी झालं.
सौजन्य – लोकशाही जागर मंच