ग्वाल्हेर घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अवघ्या संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. कसदार गायकी, संगीताकडे बघण्याचा विशेष दृष्टिकोन, गायनात जितकी उत्तुंगता तितकाच साधेपणा राहणीमानात अशा मालिनीताईंच्या अशा अचानक जाण्याने त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. मालिनीताईंचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी आज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे.
मालिनीताईंनी देशविदेशातील अनेक संगीत महोत्सवात आपली कला सादर केली होती व रसिकांची दाद मिळवली होती. गुणीदास संमेलन-मुंबई, तानसेन संगीत समारोह-ग्वाल्हेर, सवाई गंधर्व महोत्सव-पुणे यासह अनेक मोठमोठ्या संगीत समारोहात त्यांनी आपल्या गायनाची मोहिनी रसिकांवर घातली होती.