भाष्य
आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे. शूरवीर योद्ध्यांना जन्म देणारा आहे. हा संत महंतांचा भूमीप्रदेश आहेच पण मानवतेकडून महात्म्याकडे नेणाऱ्या आध्यात्मिक आणि सामाजिक चिंतनाची जन्मदात्री आहे. जगामध्ये एकच असा देश आहे, की ज्याठिकाणी प्रत्यक्ष आपल्या असीम त्यागाने आणि जाज्वल्य परिक्रमाने मानवी जीवनाची विविध अंगे विकसित करण्यासाठी अक्षरशः या योद्ध्यांनी, महापुरुषांनी अथक परिश्रम केले आहेत. त्यातीलच अग्रगण्य लढवय्ये म्हणजे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक. त्यांची आज ७ सप्टेंबर २०२३ रोजी २३२वी जयंती! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित केलेल्या त्यांच्या अभिवादन कार्यक्रमानिमित्ताने…
आद्य क्रांतीवीरांचा जन्म
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला. तेव्हा श्रीमार्तंड खंडोबाभक्त उमाजी नाईक यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले. म्हणून त्यांना आद्य क्रांतिवीर म्हणतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या भिवडी गावामध्ये नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी, पुरंदर किल्ल्याची राखण करणाऱ्या रामोशी-बेरड समाजातील दादोजी खोमणे व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला.
उमाजी जन्मापासूनच अतिशय हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचेपुरे आणि करारी होते. त्यामुळे आपसूकच त्यांनी पारंपारिक हेरकला लवकरच आत्मसात केली. जसजसे उमाजी वयाने मोठे होत गेले, तसे त्यांनी वडील दादोजी यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीरकामठा, गोफणी चालवायला शिकले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी मुंबईकर इंग्रजांशी १८०६ मध्ये तह करून मांडलिकत्व पत्करत त्यांनी इंग्रजांचे पाल्य म्हणून काम सुरु केले. इंग्रजांच्या मदतीने मराठा सरदारांबरोबर लढाया करू लागले. ‘फोडो, झोडा आणि राज्य करा’ या नीतीचा वापर करत त्यांनी रामोशी समाजाकडे असलेली पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारीही काढून त्यांच्या मर्जीतल्या लोकांकडे दिली. साहजिकच रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. इकडे शेतकरी, शेतमजूर, आलुतेदार, बारा बलुतेदार, व्यापारी सततच्या लढायांना कंटाळलेले होते.
तुरुंगातच लिहिण्या-वाचनाचे शिक्षण
म्हणूनच उमाजींनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्फूर्तीस्थानी मानून स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याची घोषणा केली. खुशाबा रामोशी, विठू नाईक, कृष्ण नाईक, पांडू नाईक बाबू सोळसकर यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरोधात त्यांनी पहिल्या बंडाची घोषणा केली. इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून समाजातील गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. इंग्रजांनी उमाजींना १८१८ मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. या काळात उमाजी लिहायला-वाचायला शिकले आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरोधात अजून कारवाया वाढवत अनेक इंग्रज छावण्यांवर हल्ला करून त्यांची संपत्ती लुटण्यास सुरुवात केली.
उमाजी नावाचा झंझावात
उमाजी यांनी पांच इंग्रजांची मुंडकी कापून पुण्याच्या मामलेदाराकडे पाठवली. २४ फेब्रुवारी,१८२४ मध्ये उमाजींनी १५० जणांच्या टोळीसह भांबुर्डा येथील इंग्रजांचा मोठा खजिना लुटला होता. त्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारविरोधी लढाईसाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी सासवड, सातारा, पंढरपूर, नातेपुते, मिरज, सांगली येथील राजे-रजवाडे, सरदार, सावकार, पाटील,मोठे वतनदार इ. ना लुटून संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. उमाजींच्या या झंझावाताला इंग्रज कंटाळले होते. त्यांनी उमाजी व त्यांच्या साथीदारांची माहिती देणाऱ्यास व पकडून देणाऱ्यास रोख बक्षीस लावले आणि लोकांनी बंड करणाऱ्या विरोधात सहकार्य करावे असे लिखित स्वरूपाचे दोन जाहीरनामे प्रसिद्ध केले. उमाजींचा पाठलाग करण्यासाठी पुण्यात कॅप्टन मन्सफिल्ड याच्या नेतृत्वाखाली घोडदळाची तुकडी तैनात केली. तसेच १००/१०० जणांच्या पायदळाच्या तुकड्याही त्याच्या मदतीस दिल्या. पण उमाजींच्या सैन्याने त्याला पुरते हैराण करून सोडले होते.
उमाजींचे सैन्य
राजे उमाजी नाईक यांनी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नोव्हेंबर १८२७ पासून राज्यकारभार सुरू करून लोकहिताचे निर्णय घेत नवीन राज्य निर्माण केले. त्यांचे नाव महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनावर कायमचे कोरले गेले ते त्यांच्या देशभक्तीच्या संदर्भात. खरंतर त्यांनी स्वराज्यनिर्माते शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून इंग्रज सरकारला पर्यायी शासन व्यवस्था निर्माण केली. आपण या भूमीचे मालक आहोत, या भूमीचे रक्षण करणे हाच आपला धर्म आहे. इंग्रज परके आहेत, त्यांना भारतात राज्य करावयाचे आहे, ते आपल्याला गुलाम बनवू पाहत आहेत, त्यांना विरोध करण्यासाठी सर्वांना एकत्र करत त्यांनी सशस्त्र सैन्याची भरती केली. इंग्रजांना मदत करणाऱ्या गावांना आणि गावकऱ्यांना जरब बसवली. जानेवारी,१८२८ पर्यंत उमाजींकडे पांच हजार सैनिकांची फौज तयार झाली होती. या कामी त्यांना त्यांचे मित्र क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचीही मदत झाली. लहुजींच्या तालमीत जावून सुराज्यासाठी खलबते करत, तालमीतील अनेक तरुणांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा उभारण्याचे बेत आखू लागले. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देवू नये, त्यांची लुट करू नये अशी सैनिकांन त्यांची सक्त ताकीद होती. सैनिकांना वेळच्या वेळी पगार दिला जात असे. पराक्रम करणाऱ्यास विशेष बक्षीस दिले जायचे. प्रत्येक तुकडीत एक गुप्तहेर असे. उमाजी सैनिकांना प्रत्येकी आठ रुपये तर गुप्तहेरांना प्रत्येकी सात रुपये पगार देत असत.
स्त्रीशक्तीबद्दल नितांत आदर
राजे उमाजींच्या मनात स्त्रीशक्तीबद्दल नितांत आदर होता. त्यांनी मार्च १९२८ मध्ये लेखी आदेश काढून दिले त्यात ते म्हणतात, “स्त्रियांवर अत्याचार करू नका, आपल्या पत्नीशी एकनिष्ठ रहा. लबाडी केल्यास गर्दन छाटली जाईल. स्त्री ही देव्हाऱ्यातील देवता आहे, मग ती कोणत्याही जातीधर्माची असो. आमच्या मुजऱ्याचा पहिला मान स्त्रीला”. खऱ्या अर्थाने राजे उमाजी हे छत्रपती शिवरायांच्या आदर्श कारभाराचे उत्तम उदाहरण घालून देत होते. चिडलेल्या इंग्रजांनी पकडण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला. पण राजे उमाजी इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी स्वतंत्र राज्याचा एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. यालाच हिंदुस्थानच्या सामाजिक न्यायाचा पहिला स्वतंत्र जाहीरनामा म्हणता येईल.
हिंदुस्थानच्या सामाजिक न्यायाचा पहिला स्वतंत्र जाहीरनामा
राजे उमाजींनी केवळ महाराष्ट्राचा नाही तर संपूर्ण भारत देशाचा विचार करून राष्ट्रीय भावना जागृत करणारा सर्वसमावेशक जाहीरनामा काढून आपल्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले, हेच त्यांच्या जाहीरनाम्यावरुन लक्षात येते. ह्या मराठीतील जाहीरनाम्याचा अनुवाद कॅप्टन माकिंटोस अलेक्झांडर यांनी १८३३ मध्ये लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकात दिला आहे. तो जाहीरनामा असा…
१) सर्व राजे, जहागीरदार, सरदार व अन्य लोकांनी जे जे इंग्रज भेटतील त्यांची हत्या करावी.
२) नवीन स्थापन होणारे सरकार अशा लोकांना जहागिरी, इनामे व रोख रक्कम देईल.
३)त्यांची वंशपरंपरागत वतने इंग्रजांनी नष्ट केली असतील, तनखे रद्द केले असतील त्यांना नवीन सरकार पुन्हा बहाल करेल.
४) भारतातील सर्व जनतेने एकदम उठाव करून संपूर्ण देशात इंग्रजांविरोधात गोंधळ, अराजकता माजवावी.
५) इंग्रज घोडदळ व पायदळातील भारतीय लोकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांवरील निष्ठा बाजूला ठेवून त्यांना अटक करावी. ६) इथल्या इंग्रज लोकांची मालमत्ता लुटावी किंवा नाश करावा, त्यांचे खजिने लुटावेत, ते सर्व स्वतःच्या मालकीचे समजावे, त्यांना कोणताही जाब विचारला जाणार नाही.
७) जी गावे, खेडी जमिनीचा शेतसारा इंग्रजांना दे आहेत ते त्यांनी त्वरित थांबवावे. या हुकुमाविरुद्ध वागणाऱ्या गाव/खेड्यांना बेचिराख केले जाईल.
८) जी जात अथवा मुसलमान या जाहीरनाम्याविरुद्ध वागतील ते स्वतःवरच मोठे संकट व दैवी आपत्ती ओढवून घेतील.
९) शास्त्रातच सांगितले आहे की इंग्रजांचे राज्य नष्ट होणार ते लोक लवकरच जातील आणि नव्या न्यायाधिष्ठित राज्याची स्थापना होईल.
अशा या महान लढवय्याला लक्षावधी इंग्रज सैन्य जंग जंग पछाडूनही वर्षानुवर्षे कैद करू शकले नाहीत तो आद्यक्रांतिकारक राजाची फंदीफितुरीने, दगाबाजीने, विश्वासघाताने गुप्त माहिती इंग्रजांना दिली गेली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली गांवात त्यांना पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला. न्यायाधीश जेम्स टेलर याने उमाजींना फाशीची शिक्षा ठोठावली. दि.३ फेब्रुवारी,१८३२ ला नरवीर राजे उमाजी हसतहसत फासावर चढले. त्याना शत शत वंदन!
डॉ.सुनील दादोजी भंडगे,
अध्यासन प्रमुख ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे