विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड
“फिनटेक कशा प्रकारे लोकांना लाभदायक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेएएम त्रिसूत्री”
विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड यांनी केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय), पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) आणि फिनटेक कन्व्हर्जन्स काऊन्सिल (एफसीसी) यांनी मुंबईत संयुक्तपणे आयोजित केलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2023 या कार्यक्रमात बीजभाषण करताना ते आज बोलत होते.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड म्हणाले की जेएएम (जनधन, आधार आणि मोबाईल) त्रिसूत्री ही परिवर्तन झालेल्या भारताच्या आणि सुविकसित डिजिटल भारताच्या चित्रामागची महत्त्वपूर्ण शक्ती आहे. फिनटेक (आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान) कशा प्रकारे सामान्य जनतेला लाभदायक ठरू शकते याचे ते एक उत्तम उदाहरण आहे. ते म्हणाले की देशातील 50 कोटी लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे आणि जन धन खातेधारकांनी या खात्यांमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली आहे. याच संदर्भात भारतात आतापर्यंत 1.35 अब्ज आधार क्रमांक जारी केले असून देशात सध्या 800 दशलक्ष सक्रीय मोबाईल धारक आहेत. देशातील अतिदुर्गम, दूरवरच्या आणि आदिवासी भागांमध्ये बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी फिनटेक अत्यंत उपयुक्त ठरत आहेत असे मत त्यांनी नोंदवले. मायक्रो-एटीएम सारखे उपक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणाले. या उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील 13.5 कोटी लोकांना दारिद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे असे त्यांनी पुढे सांगितले. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना, आर्थिक समावेशन आणि आर्थिक साक्षरतेचा प्रसार यांच्या अंमलबजावणीमध्ये डिजिटल पेमेंट अॅग्रीगेटर्सनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे डॉ.कराड यांनी पुढे सांगितले.
सरकारी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये फिनटेकचे महत्त्व अधोरेखीत करताना, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड म्हणाले की पीएम स्वनिधी सारख्या योजनांसाठी लाभार्थी पोर्टलवर जाऊन कर्जासाठी अर्ज सादर करतात आणि नंतर सरकार फेरीवाले तसेच छोट्या विक्रेत्यांना डीबीटीच्या माध्यमातून डिजिटल स्वरुपात निधी देते. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये डीबीटीद्वारे वर्षातून दोन वेळा किसान सन्मान निधीची रक्कम हस्तांतरित करण्यासाठी देखील फिनटेक अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्याचप्रमाणे, देशातील 43 कोटी लोकांना पीएम मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे.
भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, या स्थानावरून जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थानी झेप घेताना फिनटेक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडेल अशी ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांनी यावेळी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले की आर्थिक क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि यात फिनटेक महत्त्वाची कामगिरी करू शकतील. फिनटेकच्या वापराबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर घोटाळ्यांना अटकाव करण्याकडे देखील अधिक लक्ष दिले गेले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
ग्लोबल फिनटेक फेस्ट आयोजित केल्याबद्दल संबंधित आयोजकांची प्रशंसा करून डॉ.कराड म्हणाले की या वार्षिक उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे हे आनंददायक आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच नवोन्मेषाला पाठींबा दिला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वैज्ञानिक तसेच संशोधक यांचे मनोबल वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.