मुंबई उच्च न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नोंदवलेल्या दोन्ही एफआयआर रद्द केल्या आहेत. राजकारण्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी शुक्ला यांच्याविरुद्ध हे दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते.
गुप्तचर विभागाकडून फोन टॅपिंग प्रकरण घडले होते त्यात शुक्लांवर हे गुन्हे दाखल झाले होते.एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना गुन्हे नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडं, कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारनं मंजुरी देण्यास नकार दिला होता.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणारे हे फोन टॅपिंग प्रकरण आता अखेरीस पूर्णपणे बंद झाले आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असल्यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासात जे आरोप करण्यात आले ते निष्पन्न होत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे.