उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूकीतील उमेदवारी अर्जात दोन गुन्हे दडवल्याच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होते. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मत न्यायालयाने मांडले. त्यामुळेच या प्रकरणी फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आले आहे. नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला आहे. या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते.
वकील सतीश उके यांनी या प्रकरणात तक्रारदार म्हणून याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. या प्रकरणाचा निकाल 5 सप्टेंबर रोजी सुनावला जाणार होता. परंतु न्यायालयाने निकालाची तारीख ही 8 सप्टेंबर निश्चित केली. अखेर नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केले
देवेंद्र फडणवीस यांच्या 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात दोन गुन्हे नमूद न केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात दोन गुन्हे नजरचुकीने नमूद करायचे राहिल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले होते.