राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुन येथे दाखल झाले होते . राजेंद्रसिंह यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. त्यांच्या उपस्थितीत राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात शिवधनुष्य हातात देऊन प्रवेश दिला.
माझा आशीर्वाद नसता, तर गेहलोत कधीच मुख्यमंत्री झाले नसते, असा दावा गुढा यांनी नुकताच केला होता. २४ जुलै रोजी विधानसभेत लाल डायरी झळकवल्याबद्दल बडतर्फ झालेल्या गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.चर्चेत असलेल्या लाल डायरीमध्ये राजस्थानच्या गेहलोत सरकार मधील भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. ही डायरी एकेकाळी गेहलोत यांचे जवळचे मानले जाणारे राजेंद्रसिंह गुढा यांच्याकडे असल्याचे बोलले जाते.त्यांनी मंत्री असतानाच स्वतःच्या सरकार वर टीका केल्याने त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई झाली होती. .