श्रावण महिना आला की प्रत्येक वारांना महत्त्व प्राप्त होते. सोमवार – शंकर महादेव. मंगळवार – मंगळागौर. बुधवार -बृहस्पती. गुरूवारी – दत्त आणि गुरू यांचे महत्त्व. शुक्रवार, जिवतीची पूजा आणि शनिवार – अश्वत्थ मारुती पूजन.
अश्वत्थ याचा अर्थ पिंपळ वृक्ष. या वृक्षाचे महत्त्व आणि मारुतीचे महत्त्व श्रावण शनिवारी आहे. पिंपळाच्या झाडाखाली मारुतीची मूर्ती असेल तर खूप शुभ समजले जाते. जर मारुती एकीकडे आणि पिंपळ एकीकडे असे असले तरी या दोन्हीची पूजा करणे शुभ मानले जाते. जर शनिवारी मंगल मुहूर्तावर स्नान करून पिंपळाला आणि मारुतीला जल अर्पण केले तर आपल्या मागचे संकट, दरिद्र, दुःख नष्ट होते अशी श्रद्धा जनमानसात आहे.
जर बेलाचे पान दुधात घातले आणि ते दूध पिंपळाच्या मुळाशी घातले तर त्याचा सुगंध पिंपळाला येतो.
ऋग्वेद काळापासून या वृक्षाला निर्मितीचा वृक्ष म्हणून ओळखले जाते. यज्ञकर्मात आणि उत्तरा अग्निमंथनात या वृक्षाला विशेष महत्त्व आहे. गीतेमध्ये सर्व वृक्षात श्रेष्ठ वृक्ष पिंपळ आहे आणि तो वृक्ष म्हणजे स्वतः श्री भगवान विष्णू होय.
त्याचीही एक कथा आहे.
एक धनंजय नावांचा विष्णुभक्त होता. एकदा भगवान विष्णुंनी त्याची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्याला सगळीकडून अडचणीत आणले. सर्व नातेवाईकांनी त्याला एकाकी पाडले आणि ते दिवस थंडीचे होते.
धनंजय शेकोटीसाठी वाळलेली लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. त्याने लाकडे तोडता तोडता पिंपळाच्या झाडावर घाव घातला तेंव्हा तेथे विष्णू प्रगट झाले आणि धनंजयला म्हणाले “तू माझ्यावर घाव घातल्याने माझे सारे शरीर रक्तबंबाळ झाले आहे.” ते ऐकून धनंजयला खूप वाईट वाटले आणि तीच कुऱ्हाड धनंजयने स्वतःच्या मानेवर मारून घेतली त्यामुळे तो खाली कोसळला. तेव्हा विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी धनंजयला अभय दिले. त्यांनी धनंजयला उठवले आणि त्यास अश्वत्थ मारुतीचे पूजन करण्यास सांगितले आणि त्याने मनोभावे भक्तिभावे तसे पूजन केले. पुढे कुबेरानेही धनंजयावर प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला. त्याला विपुल धन-द्रव्य देऊन संतुष्ट केले आणि धनंजय सुखी झाला. अशी कथा आहे
श्री रामदास स्वामींनी सर्व जनतेला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली , १.चाफळ येथे दोन मंदिरे आहेत वीर मारूती ,प्रतापी मारूती २.माजलगाव ३.शिंगणगाव ४.उंबरजचा मारूती ५.मसूर ६.शहापूर ७.बहेगाव ८.मनपाडळेचा मारूती ९.
पारगावचा मारूती असे 11 मारुती मंदिरांची स्थापना केली आहे, आणि स्वतः श्री रामदास स्वामीसुध्दा मारुतीचाच अंश आहेत, त्यांच्यावर सुर्यनारायणाची सुध्दा कृपा आहे.
अशा प्रकारे आपल्याकडे मारुती पूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे..
चंदाराणी देशपांडे ,तेजस्विनी शाखा
सौजन्य – सामिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र