मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांवर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या बैठकीचे आयोजन केले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज संध्याकाळी ही बैठक पार पडणार असून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर सर्व सदस्य उपस्थित असतील.
मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण चालू आहे.मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज १४ दिवस असून, कालपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत.
मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढण्यासाठी आणि मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द असून त्यासाठी सरकार अतिशय गंभीर उपाययोजना करत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या बैठकीनंतर तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा निघू शकेल अशी आशा राज्यसरकार बाळगून आहे.