नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात इस्लापूर हे छोटे खेडेगाव. परंतु या ठिकाणी निजाम सरकारचे त्याकाळी मोठे पोलीस ठाणे होते. शेजारी विदर्भाच्या सीमेवर व पैनगंगेच्या बाजूला उमरखेड येथे स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा कॅम्प होता. उमरी बँक लुटीतून पैशाची मदत झाली होती आणि आता शस्त्रास्त्र मिळावे म्हणून निजामी शस्त्रकारावर हल्ले करण्याचा निश्चय स्वातंत्र्य सैनिकांनी केला.
‘इस्लापूर हल्ला’ त्याचाच एक भाग होता. 28 जून 1948 रोजी इस्लापूर पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचा दृढ निश्चय करण्यात आला. गाव छोटे व गावात हिंदूंची मिश्र वस्ती होती. गावाबाहेर मैदानात पोलीस ठाणे व त्यामागे मुस्लिमांची वस्ती होती. त्यातही अधून मधून रजाकारांची वर्दळ असे .ठाण्याच्या बाजूला तारेचे कुंपण मुख्य इमारतीत शस्त्रे बंदुका हा इस्लापूर ठाण्याचा आराखडा होता. एक पोलीस इन्स्पेक्टर व दहा-पंधरा पोलीस येथे असत. परंतु हल्ल्याच्या दिवशी शेजारच्या गस्तीचे पोलीस आल्याने त्यांची संख्या वाढली व वाढलेल्या पोलिसांच्या संख्येची स्वातंत्र्यसैनिकांना कल्पना नव्हती.
27 जूनच्या मध्यरात्री पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचे ठरले. परंतु दुर्दैवाने तसे घडले नाही. 27 जून 1947 च्या रात्री उमरखेड कॅंपच्या 55 सैनिकांची एक तुकडी बिटरगाव मार्गे इस्लापूरच्या दिशेने निघाली. मार्गात पैनगंगा नदी होती व तिला अचानक पूर आला त्यामुळे प्रवास कठीण झाला. लष्करी वेशात वावरणाऱ्या जयवंत पाटला बरोबर जानकीराम राठी , किशोर शहाने ,साहेबराव बारडकर, नागनाथराव रांजणीकर ,बन्सीलाल तोष्णीवाल व लखासिंह लमानी ही या मोहिमेची सूत्रधार मंडळी होती.
चिखलातील रात्रीचा प्रवास व पुराच्या संकटाने सर्वजण थकून गेले होते. इस्लापूर जवळील पैनगंगा ओलांडण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी सर्वांनी चपला, बॉम्ब, शस्त्रे डोक्यावर घेऊन छातीपर्यंत वाहणाऱ्या त्या पाण्यातून नदी पार केली व पोलीस स्टेशनच्या जवळ पोहोचले. परंतु तोपर्यंत उजाडले होते. रात्रीचा होणारा हल्ला भर दिवसा करण्याची पाळी त्यांच्यावर आली .
बाजूला गस्तीचे पोलीस व त्यांची घोडी होती. सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला वेढा घातला. बन्सीलालने बॉम्ब फेकला, परंतु तो भिजल्यामुळे फुटला नाही. कारण त्यानंतर सर्वजण बंदूक बंदुकांचा हल्ला करणार होते. तरी रांजनीकरांनी नेम धरून पहारेकऱ्याला ठार मारले. या आवाजाने फौजदार व सर्व पोलीस खडबडून जागे झाले सैरा वैरा पळू लागले .
ठाण्यातील पोलिसांनी आतून गोळीबार सुरू केला. शहाणे साहेबराव व माळोदेनी पिछाडीकडून हल्ला केला .परंतु पोलिसांनी चोख उत्तर दिले. पोलीस व स्वातंत्र्य सैनिकांचे तुंबळ युद्ध सुरू झाले. बंदूकधारी जयवंतराव वायपनकर निर्भयपणे पुढे धावला पण, पोलिसांच्या गोळीबाराला तो बळी पडला. जानकीलाल व तुकाराम करंजेकर पाटलाच्या मदतीला जाताना पोलिसांनी त्यालाही यमसदनी पाठवले. तीन तरुण हूतात्मे झाले.
गोळीबार चालू होता. रांजनीकरांनी परतीची शिट्टी वाजली व उर्वरित सैनिक गोळीबार करत शेजारच्या जंगलात पसार झाले. पोलीस ठाण्याच्या स्वयंपाकगृहात अडकलेले शहाणे, साहेबराव व लखा लमानी उडी मारून सरपटत बाहेर पडले. परंतु सरपटत जाताना लाखाच्या मांडीला गोळी लागली बैलगाडीतून येताना त्याचाही प्राण गेला.
इकडे ठाण्यातील तीन तरुणांचे मृतदेह पाहताच गावकरी क्रूद्ध झाले. त्यांनी स्टेशनवर व मुस्लिम वस्ती वर हल्ला करून आग लावली आणि ह्याच ज्वालाग्नाही व क्रोधाग्नीत तीन हुतात्म्यांचे दहन करून गावकऱ्यांनी त्यांना मानवंदनाच दिली.
साभार: राजेंद्र जैस्वाल, किनवट
संदर्भ: मुक्तिगाथा मुक्तिदाता, डॉ. पी. जी. जोशी, पृष्ठ 80, 81
#मराठवाडा #मराठवाडा_मुक्तीसंग्राम #नांदेड #इस्लापुर
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,देवगिरी