मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर व त्यातील मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य शासनाने बोलवलेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकीची वाक्ये घालत, त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला असे सांगत समाजमाध्यमांमधून व माध्यमांमधून गेल्या दोन दिवसांपासून पसरविले जात आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण करत या अपप्रचाराचा निषेध केला आहे. जनतेने या खोडसाळपणाला बळी पडून नये असे आवाहनही त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर (X) हँडलवरून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
“मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच “मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.” असे सांगत त्यांनी या खोडसाळपणामागील असामाजिक तत्वांचा निषेध केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1701879243851063395