गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठा सजल्या असून घरोघरी गणपती बाप्पासाठी आरास करण्याची लगबग सुरू आहे. अगदी थोड्या वेळात जर तुम्हाला सुंदर आरास करायची असेल तर खालील प्रमाणे ट्रिक वापरून तुम्ही अत्यंत मनमोहक अशी आरस करू शकता.
कागदी ग्लास पासून बनवा बाप्पाचा मुकुट!
बाप्पासाठी मुकुट बनवताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाच ते सहा कागदी ग्लास घ्यायचे आहेत आता हे ग्लास उभ्या बाजूने अर्धे करायचे आहेत, त्यानंतर मुकुटासारखे ते ग्लास गोल आकारात एकमेकांना चिटकवून त्यावर आपल्या आवडीचा रंग देऊन सोबत विविध रंगाच्या टिकल्या लावून त्यावर चमकी चिटकवून बापाचा मुकुट तुम्ही तयार करू शकता!
असा करा मोदकाचा आरास!
आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी मोदक हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे, हे आपण जाणतोच! जर तुम्हाला मोदकाच्या आकाराचा आरास तयार करायचा असेल तर तुम्ही बाजारात मोदक बनवण्याचे यंत्र मिळते, त्याचा वापर करून विविध रंगात मोदकाच्या आकाराचा आरस करू शकता!
बाप्पासाठी बनवा चंद्रयानाचा आरास!
नुकतेच भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने चंद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. या निमित्ताने आपण आपल्या गणपती बाप्पासाठी चंद्रयान मोहिमेची आरास तयार करू शकतो.
यासाठी तुम्हाला कार्डबोर्ड लागेल, त्याचबरोबर रंग आणि गोटिव कागद लागतील!
कार्डबोर्डच्या सहाय्याने चंद्राची प्रतिकृती तुम्ही तयार करा. अशा दोन प्रतिकृती तयार करून थ्रीडी स्वरूपात एक चंद्र तयार करा, जेणेकरून आपल्या गणपती बाप्पाला बसण्यासाठी पाठ तयार होईल! आता दुसऱ्या कार्डबोर्डचा वापर करून तुम्ही चंद्रयान जसे गोल होते तसे तीन विविध गोल तयार करा. सोबत चांद्रयान खाली असलेले इंजिन ज्या आकाराचे होते त्या आकाराचे चार गोल तयार करा. मध्यभाग मोठा आणि बाजूचे दोन गोल छोटे एकमेकांना जोडून घ्या, आणि खाली हे चार लहान कार्डबोर्ड गोल स्वरूपात इंजिनच्या रूपाने चिटकवा. आता हे तयार झालेले चंद्रयान गणपती बाप्पाच्या पाठीमागे उभे करा, आणि त्याच्या बाजूला कापसाने आभाळ दर्शवा! तुमचे चंद्रयान आरस तयार!